मालवण /-
राज्यात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली असताना या लसीकरण मोहिमेसाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली आहे. शासनाने सुरू केलेल्या या ऑनलाईन नोंदणी पद्धतीचा काही जणांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून फायदा उठवीत दुसऱ्याच तालुक्यातील लोक लसीकरणाचा लाभ घेत असंल्याचा प्रकार चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे. हा प्रकार चौके गावचे कार्यतत्पर सरपंच राजन तथा राजा गावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी या ऑनलाईन नोंदणी पद्धतीला आक्षेप घेतला असून चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात जी दोनवेळा लसीकरण मोहीम राबविली गेली, त्यात स्थानिकांना डावलून कणकवली, ओरोस, कुडाळ येथील लोकांनी या लसीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकाराची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच राज्याच्या आरोग्य संचालकांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
या संबंधीचे अधिक वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने १८ ते ४४ वयोगटातील लोकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लसींची लसीकरण मोहीम ४ मे पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. या लसीचा तुटवडा जाणवत असल्याने सर्वत्र लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी आढळून येते. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे कोणीही कुठेही लसीकरणाचा लाभ घेऊ शकतो. या ऑनलाईन नोंदणी पद्धतीचाच काही ठिकाणी पुरेपूर फायदा उठविला जात असल्याने ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत असणाऱ्या गावातील स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. काही ठिकाणी दुसऱ्याच तालुक्यातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा फायदा घेत असल्याचा प्रकार निदर्शनास आले आहे.
मालवण तालुक्यातील चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी ७ आणि ८ मे या दिवशी लसीकरण मोहिम केली गेली. या लसीकरण मोहिमेच्या वेळी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोलमाल केले जात असल्याचा आरोप चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी केला आहे. याविषयी बोलताना श्री. गावडे यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ मे रोजी २४० लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील २२० जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. उर्वरित शिल्लक राहिलेल्या २० लसी मध्ये ७० लसींची भर घालून ९० लसी लोकांना देण्यात आल्या. या दोन वेळा झालेल्या लसीकरणात स्थानिकांना अंशतः लाभ घेता आला. याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन नोंदणी पद्धत होय, असे सांगून ते म्हणाले, ७ आणि ८ मे या दोन दिवशी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात जे लसीकरण झाले त्यात ज्यादा करून कणकवली, कुडाळ तालुक्यातील लोकांचा ज्यादा भरणा होता. वस्तुतः ज्या आरोग्य केंद्रात लसीचा पुरवठा होतो त्याची माहिती आरोग्य विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहीत असते. त्यापुढेही लसीकरण प्रक्रिया केव्हा सुरू होणार याचे सेशनही मध्य रात्री ठरविले जाते. व दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम सुरू होते. ज्यावेळी लसीकरण मोहिमेचे सेशन ठरविले जाते त्यानंतर काही कालावधीतच काही ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केली जाते. नेमका असाच प्रकार चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही वेळा घडला असून लसीकरण सेशन बाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असतानाही भर मध्यरात्री ऑनलाईन नोंदणी होतेच कशी ? असा सवाल करून चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत संबंधित आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा पद्धतीने लसीकरण मोहीम सुरूच राहिली तर स्थानिक लोकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच ऑन दि स्पॉट लसीकरण नोंदणी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.