मुंबई /-
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता मोठ्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.
भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनीदेखील सरकारला इशारा देत आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ आहे, असं म्हटलं आहे.
“या सरकारनं मराठ्यांचा विश्वासघात केला. आज आमच्या समाजाचं भविष्य अंधारात गेले आहे. कुठल्या तोंडानं या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचं आणि कशासाठी? आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ आहे,” असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारला इशारा दिला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.