तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नगराध्यक्ष बैठकीत निर्णय…

मालवण /-


मालवणात शहरात कर्फ्यु न लावण्याचा निर्णय झाल्याने उद्या शुक्रवारपासून सकाळी अकरा वाजल्यानंतर शहरात प्रशासनाकडून धडक कारवाई मोहिम राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तहसीलदार अजय पाटणे व पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्यासोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत स्पष्ट केले आहे. उद्यापासून व्यापाऱ्यांनी दुकाने वेळेत बंद करावीत यासाठी सकाळी पावणे अकरा वाजता नगरपालिकेचा भोंगा वाजवून वॉर्निंग अलर्ट दिला जाईल. अकरा वाजल्यानंतर ज्यांची दुकाने उघडी मिळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत ठरलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडून आज दुपारपासूनच करण्यात आली असून बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले आहे. प्रशासनाच्या या हालचालींमुळे मालवणातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व नियमांचे पालन होण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा ऍक्शन मोड मध्ये दिसत आहे. मालवण शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णसंख्याही वेगाने वाढत असल्याने शहरात कर्फ्यु लावण्याबाबत नगरपालिकेत पार पडलेल्या बैठकीत कर्फ्यु न लावता नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल याची सल्लामसलत करण्यात आली यावेळी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, सुदेश आचरेकर, पूजा सरकारे आदी उपस्थित होते. मालवण शहरात जनता कर्फ्यु लागणार नसल्याने कोरोनाचे संकट नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन बाबत शासनाने दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी मालवणात करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर ज्यांची दुकाने उघडी दिसतील त्यांच्यावर पाचशे ते पाच हजार रुपये असा दंड करण्यात येणार आहे. दंड करूनही त्यानंतर पुन्हा दुकाने उघडे आढळल्यास संबंधिताचे दुकान सील करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत बाजारपेठेत गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्स राहावे यासाठी अंतर्गत रस्त्यांवर बॅरिगेट्स लावण्यात येतील. भाजी व फळ विक्रेत्यांना तसेच स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांना अंतर राखून बसविण्यात येईल असे ठरविण्यात आले. तर पूर्वी प्रमाणे बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रभाग निहाय स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटावी असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सांगितले. तसेच अकरा वाजल्यानंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवरही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. विनाकारण फिरताना आढळल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी पोलिस व नगरपालिका प्रशासनास यावेळी दिल्या. दरम्यान, या बैठकीत घेण्यात आलेल्या बॅरिगेट्स लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तहसीलदार अजय पाटणे यांनी आज दुपारपासूनच सुरू केली. बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे बाजारात होणारी गर्दी कमी होण्यास व सोशल डिस्टन्स राखण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page