मालवण /-
निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना बाधितांना मोफत सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या कोळंब,मालवण याठिकाणी असलेल्या केंद्रात सुरू केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. निलक्रांती संस्थेने स्वतःहून कोविड केअर सेंटर सुरू करून चांगला उपक्रम राबविला असून तसेच जिल्ह्यातील खासगी संस्थानी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेऊन कोरोना प्रसार थांबण्यासाठी अश्या प्रकारची कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे यावेळी आम. नाईक यांनी सांगितले. निलक्रांती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी संस्थेच्या कोळंब येथील केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा प्रशासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या कोविड केअर सेंटरला मान्यता दिली. त्यामुळे हे सेंटर जिल्ह्यातील पहिले खासगी कोविड केअर सेंटर ठरले. त्याचे उद्घाटन आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रविकिरण तोरसकर, रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे डॉ. विवेक रेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, निसर्गोपचार तज्ञ व समुपदेशक सौ. नमिता चुरी, शिवसेना तालुकाप्रमुख जि. प. सदस्य हरी खोबरेकर, कोळंब सरपंच सौ. प्रतिमा भोजने, बाबी जोगी, आदी व इतर उपस्थित होते. या कोविड केअर केंद्रात १२ रुग्णांची व्यवस्था असून त्यासाठी लागणारे वैद्यकीय मार्गदर्शन रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुरविणार आहे. तसेच आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. रेडकर यांनीही या उपक्रमास शुभेच्छा देत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, पहिल्या डोस च्या वेळी जी लस घेतली आहे तीच दुसऱ्या डोसच्या वेळी घ्यावी. सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, नेहमी हात धुणे हीच खरी लस आहे, ज्यांना काही त्रास जाणवत असेल त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन व्हावे असे सांगितले.