वैभववाडी/-
मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशावर फेरविचार याचिका दाखल करावी व सुधारित अध्यादेश त्वरीत राज्य शासनाने काढावा. यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. वैभववाडी तालुका सकल मराठा समाज बांधव व पदाधिकारी या पार्श्वभूमीवर सोमवारी एकत्र येणार आहेत. तसेच या निर्णयाच्या विरोधात निषेध व्यक्त करत तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. व पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.