आंगणेवाडी येथे प्रशासनाकडून यात्रा नियोजन बैठक

देवालय परिसरातील स्थानिक दुकानेही बंद ठेवण्याच्या सूचना

मसुरे/-

येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी येथे जिल्हा प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांची जत्रा नियोजन बैठक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जत्रा ही केवळ आंगणे कुटुंबियांपुरतीच आहे. पन्नास भाविकांच्या समूहाने सोशल डिस्टन्ससह कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीय व्यक्तींना देवीचे दर्शन घेता येईल असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. आंगणे कुटुंबियां व्यतिरिक्त बाहेरील अन्य कोणत्याही व्यक्तींना जत्रेच्या दिवशी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असेही यावेळी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सभापती अजिंक्य पाताडे, मालवण पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, सरपंच सौ. मानसी पालव, सा. बां. उपविभाग मालवणचे नितीन दाणे, काका आंगणे, बाबू आंगणे,अनंत आंगणे, डॉ दिगंबर आंगणे, शशी आंगणे, सतीश आंगणे, नंदू आंगणे यासह आंगणे कुटुंबीय उपस्थित होते.
गर्दी होऊ नये या कारणास्तव मंदिर परिसरात बाहेरील व्यापारी अथवा स्थानिक व्यापारी यांना कोणत्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही. तसेच मंदिर परिसरात स्थानिक ग्रामस्थांचे जे कायमस्वरुपी हॉटेल, दुकाने व स्टॉल आहेत ते देखील जत्रे दिवशी बंद ठेवण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य पथक तैनात असणार आहे. रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात येईल, असे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी सांगितले. जत्रेदिवशी मंदिरात पहाटे ४ वाजल्यापासून दर्शनास सुरुवात करण्यात येईल. केवळ आंगणे कुटुंबीय व आंगणे माहेरवाशिणी, जावई, त्यांची मुले यांच्या उपस्थितीत उत्सव पडेल. प्रशासनाच्या सूचनेनुसार दर्शनासाठी येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत असे यावेळी अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले.
मंदिराकडे येणाऱ्या मालवण, मसुरे व कणकवली अशा तिन्ही मार्गावर बॅरिगेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. आंगणे कुटुंबियांचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, गर्दी होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मंदिर परिसरात पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येतील, असे यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. राजकीय नेते मंडळी व पत्रकार याना सुद्धा देवालयात प्रवेश नसणार असल्याचे पो. नि. सोनू ओटवणेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page