वेंगुर्ला /-
माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच साक्षरतेच्या बाबतीत आपला सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहिला आहे.आज शैक्षणिक विकासासाठी विविध निधी उपलब्ध होत आहे.येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर योग्य पध्दतीने पायाभूत सुविधा उभ्या करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी विविध प्रकारे निधी उपलब्ध होत असला तरी आज शाळांमधील पटसंख्या कमी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला शैक्षणिक क्षेत्रात आणखी पुढे नेण्यासाठी याबाबत अन्य क्षेत्राप्रमाणे लोकप्रतिनिधी, शिक्षक,पालक व इतर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी वेंगुर्ले उभादांडा नवाबाग येथे केले.
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा – नवाबाग शाळा सभामंडपाचे भूमिपूजन आज शनिवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल, जि. प.सदस्य प्रितेश राऊळ,उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष दादा केळुसकर,मच्छिमार नेते वसंत तांडेल,तालुका खरेदी – विक्री संघाचे संचालक मनिष दळवी, नगरसेविका कृपा गिरप – मोंडकर, सुजाता देसाई, मुख्याध्यापिका तन्वी रेडकर,भाजपा ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,प्रसाद पाटकर,रेडी सरपंच रामसिंग राणे,कमलेश गावडे,ता.चिटणीस नितीन चव्हाण,तुषार साळगावकर आदींसह ग्रामस्थ,पालक,शिक्षकवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना आ.नितेश राणे म्हणाले की,येथील सभामंडपामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होणार आहे.दादा कुबल हे आदर्श लोकप्रतिनिधी असून आपल्या उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ते प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत.जिल्हा नियोजन बैठकीमध्ये मतदार संघातील प्रश्न ते तळमळीने मांडतात.दादा कुबल हे येथील शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करताहेत,हे निश्चितच उल्लेखनीय आहे.तसेच शैक्षणिक क्षेत्रात कोकण बोर्ड महाराष्ट्रात अग्रेसर राहण्याचे सर्व श्रेय खा.नारायण राणे यांनाच जाते,असेही आ. नितेश राणे म्हणाले.यावेळी वसंत तांडेल यांनी खा.नारायण राणे यांच्या माध्यमातून येथे विकास झाला असून पुढील कालावधीतही त्यांचे सहकार्य राहील,असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात दादा कुबल यांच्या हस्ते आमदार नितेश राणे यांचा शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दिव्यता मसुरकर, लिलावती केळुसकर व प्रशालेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वसंत तांडेल यांनी मानले.