वायंगणी येथे २९ रोजी दादा महाराज पुण्यतिथी कार्यक्रम..

वायंगणी येथे २९ रोजी दादा महाराज पुण्यतिथी कार्यक्रम..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील नामानिष्ठ सत्पुरुष म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या दादा महाराज वायंगणीकर यांची ४८ वी पुण्यतिथी २९ जानेवारी रोजी वायंगणी येथील दत्तमंदिरासमोरील त्यांच्या समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे.
श्री समर्थ दादा महाराजांचे संपूर्ण नांव श्री. विट्ठल आत्माराम प्रभू. यांचा जन्म इ. स. १८९५ साली मालवण तालुक्यातील मौजे वायंगणी येथे झाला. पाट गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. प्रारंभी त्यांनी काही वर्षे शिक्षकाची नोकरी केली. सद्गुरू आचरेकर महाराजांनी त्यांना मंत्रानुग्रह दिला.
श्री दादा महाराजांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे यांना श्री दत्तपादुका मिळाल्या. इ. स. १९२२ साली त्यांनी वायंगणी येथे पादुकांवर घुमटी बांधली. पुढे त्यांनी इ. स. १९३१ साली वायंगणी येथे श्री दत्त मंदिर बांधले. श्री महाराजांच्या आयुष्याचा उत्तरार्ध याच मंदिरात गेला. श्री महाराजांनी चरित्रपर आत्मनिवेदन लिहिले असून ते भक्तिलीलामृत या नावाने दोन भागात प्रसिद्ध झाले आहे. बुधवार दि. ९ जानेवारी, १९७४ ला वार्धक्याने त्यांचे देहावसान झाले. श्रीदत्त मंदिरा समोरच त्यांचे समाधीस्थान आहे.
या पुण्यतिथीच्या निमित्ताने सकाळी दादा महाराज वायंगणीकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार असून संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सोशल डिस्टन्स तसेच मास्क वापरून घरगुती स्वरूपात पार पडणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..