सिंधुदुर्गनगरी
कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 ॲम्बुलन्स खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून 5 ॲम्बुलन्स जिल्ह्यासाठी मिळणार आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी 72 लाख 44 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायत यांना 8 शववाहिका ही खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोरोना आजार संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, राज्य शासनाने आता 50 टक्के निधी हा कोरोना माहामारी उपाययोजनेसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातील कोणतीही कामे तातडीने पूर्ण करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात फक्त 7 व्हेंटीलेटर होते. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात आता 56 व्हेंटीलेटर आहे. त्याचबरोबर कोविडसाठी आवश्यक असणारा औषधाचा पुरेसा साठाही उपलब्ध करण्यात आला आहे. जी औषध कमी आहेत त्यांची मागणी संबंधित यंत्रणाकडे करण्यात आले असल्याचे सांगून, पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी जिल्ह्यातील 14 मेडीकल संघटनासोबत चर्चा करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक घ्यावी. कोरोना रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. रॅपिड अँन्टीजन टेस्ट वाढविण्यावर भर देण्यात यावा. हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना तातडीने कॉरंन्टाईन करण्यात यावे. जिल्ह्यात पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करुन त्यांना अधिकचा पौष्टिक आहार देण्यात यावा.
युवा वर्गाचा सर्व्हे करावा
कोरोना कोणालाही होवू शकतो ही बाब आता स्प्ष्ट झाली आहे. आपली प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही अशी भावना युवा वर्गात निर्माण झाली असल्यामुळे त्यांचा वावर अधिक वाढला आहे. सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेने 21 ते 30 वयोगट, 31 ते 40 वयोगट, 41 ते 50 वयोगट अशा प्रकारे वर्गीकरण करुन जिल्ह्यातील युवा वर्गाचा कोरोना बाबत सर्व्हे करावा. या सर्व्हेमध्ये ज्यांना लक्षणे आढळतील त्यांच्यावर तातडीने उपचार करणे सोयीचे होईल. यामुळे कोरोनाला पायबंद घालता येईल. यासाठी जिल्ह्यात हा सर्व्हे होणे आवश्यक आहे.
कोरोना मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी
जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटीव्हची संख्या वाढत चालली असली तरी मृत्युचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्याचा कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर सध्या 53 टक्के (रिकव्हरी रेट) असून कोरोना मृत्यु दर 1.03 टक्के (डेथ रेट) आहे. हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या मानाने कमी रेट आहे. ही आशादायी बाब आहे. तरीही कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 33 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यां व्यक्तींच्या मृत्यदेहांचे अंत्यसंस्कार करताना अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण, ओरोस येथे कोविड मृत व्यक्ती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची उभारणी करण्यात येईल. याठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून अंत्यसंस्कारांची सोय करण्यात येईल. तसेच प्राधिकरण्याच्या माध्यमातून लाईट, पाणी, रस्ता व दहन करण्यासाठी व्यक्तींची नेमणूक करण्यात येईल.
अर्सेनिकम अल्बम गोळ्या वाटपाबरोबरच नॉन कोविड रुग्णांची काळजी घ्या
लोकांच्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी यासाठी अर्सेनिकम अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप आरोग्य यंत्रणेमार्फत सुरु करण्यात आलेले आहे. या गोळ्याचे डोस योग्य रितीने लोकांच्यापर्यंत पोहोचवावे. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात नॉनकोविड रुग्णांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाने नॉनकोविड रुग्णांच्या औषधौपचारावही भर द्यावा. नॉन कोविड रुग्ण कोणीही औषधाविना अथवा उपचारविना राहू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे आणि त्यांच्यावर वेळेत उपचार करावेत.
आयुष हॉस्पीटलबाबत घेतला आढावा
केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या आयुष रुग्णालयाची 30 बेडची क्षमता आहे. हे रुग्णालय तातडीने उभे करण्याची प्रक्रीया राबविण्यात यावी. यासाठी 8 कोटी 99 लाख रुपये प्रस्तावित आहेत. यापैकी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपये खर्च झालेले आहेत. आयुष रुग्णालय तातडीने उभे करुन रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात यावा. या नोडल अधिकाऱ्याने कामाचा आढावा जिल्हा प्रशासनास वेळोवेळी सादर करावा.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून जळगाव येथे मंजूर झालेले नॅशनल इन्सिट्युट मेडीसिन प्लांट आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे मंजूर करण्यात आला आहे. सदरचा प्रकल्प तातडीने जिल्ह्यात पूर्ण करण्यासाठी याबाबतचा संपूर्ण आराखडा तातडीने तयार करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून सुमारे 50 ते 60 एकर जागा मिळण्यासाठीही प्रस्ताव तयार करण्यात यावा. यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात यावा, या अधिकाऱ्यांनी या बाबतचा पाठपुरवा करावा.
*सोबत फोटो जोडला आहे.
00000