सिंधुदुर्गनगरी

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे उभादांडा- वेंगुर्ला येथे उभारण्यात येणारे स्मारक हे भव्यदिव्य करण्यावर भर देण्यात येणार असून या स्मारकासाठी 1 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारणीसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही दोन्ही कामे तातडीने पूर्ण करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कविवर्य मंगेश पाडगांवकर स्मारक व मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तसेच कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक साकारण्यासाठी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई यांच्याकडील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, मंगेश पाडगावकर यांच्या कविता, त्याचा जीवन परिचय, या स्मारकांमध्ये साकारण्यात येईल. पारंपांरिक पध्दतीचे स्मारक न उभारता आधुनिक पध्दतीने नवनवीन संकल्पना यामध्ये साकारण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे या स्मारकाचा आराखडा तयार करावा. या स्मारकासाठी एमटीडीसीने त्यांच्या नियोजित पंचतारांकीत हॉटेलच्या परिसरातील जागा उपलब्ध करून द्यावी. मच्छिंद्र काबंळी नाट्गृहाचा प्रस्ताव कुडाळ नगर पंचायतीने तातडीने तयार करावा. सदरचे नाट्यगृह हे अत्याधुनिक पध्दतीचे असावे यावर भर देण्यात यावा. तसेच कुडाळ शहरात उद्यान उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा अशा सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.
• सोबत फोटो जोडला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page