कुडाळ,/-

रंगबहार कुडाळ या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. मंदार रमण कुलकर्णी स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निबंध स्पर्धेत व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, तालुका सावंतवाडीचा विद्यार्थी शुभम अजित पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

‘मी आणि माझे / माझा बाबा’ या एक जिव्हाळ्याच्या विषयावर कुडाळच्या रंगबहार संस्थेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आठवी ते पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेला गोवा आणि महाराष्ट्रातून फार चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विहित मुदतीत १४८ स्पर्धक सहभागी झाले होते. मान्यवर परीक्षकांनी या निबंधांचे परीक्षण करून निकाल जाहीर केला.

या निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक – शुभम अजित पाटील, व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, तालुका सावंतवाडी, द्वितीय क्रमांक (विभागून) – हर्षदा अनंत कुडव, व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, कुडाळ आणि उषा वीरेंद्र पवार, शिवाजी विद्यालय, हिर्लोक,ता. कुडाळ, तृतीय क्रमांक – सुजय सत्यवान जाधव, कणकवली कॉलेज, कणकवली, उतेजनार्थ – साक्षी निवृत्ती गुरव, पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय, हुमरमळा, ता. कुडाळ, सुविता अशोक नेरुरकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र कुडाळ, योगिनी विनायक जाधव, पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय, हुमरमळा, ता. कुडाळ. यातील पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख रु. ३००१/-, २००१/ आणि १००१/-, रंगबहार चषक आणि प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ तीन क्रमांकाना रंगबहार चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज सभागृह (वातानुकूलित), कुडाळ येथे सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून होणार आहे. सर्व स्पर्धकांनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन रंगबहार संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page