मसुरे /-

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, महिला फ्रंटच्या वतीने क्रांतीज्योती ज्ञानमाऊली सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी ‘मी सावित्री जोतिबा फुले बोलतेय’ या विशेष नाट्याभिनय एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या युट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आले.
दर्पण प्रबोधिनीची बालकलाकार कु. आर्या किशोर कदम हिने सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेत सादर केलेल्या एकपात्री स्वगतातून आजच्या वर्तमान परिस्थितीत जगत असलेल्या स्त्रियांच्या वास्तवतेवर प्रकाशझोत टाकला. आजही ज्या मानसिकतेतून स्त्रियांना जावे लागत आहे त्याचा यथार्थ नाट्यविष्कार आपल्या अंगभूत कलाविष्कारातून आणि प्रभावी अभिनयातून साकार केलेले हे सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले.
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचे अध्यक्ष आणि निवेदक, कवी राजेश कदम यांच्या संकल्पनेतून आणि सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या संहितालेखनाला आर्या कदम हिने आपल्या अभिनयातून उत्कट न्याय दिला.
या एकपात्री नाट्याविष्काराचे संपूर्ण चित्रीकरण, संकलन आणि दृश्यनिर्मिती तंत्रकुशल कलादिग्दर्शक विशाल हडकर यांनी केले.
निर्मिती सहाय्य आनंद तांबे, नेहा किशोर कदम,स्नेहल सुनील तांबे संजना संतोष तांबे, अलका नितीन कदम,सुचिता दिलीप कदम आणि दर्पण महिला फ्रंटच्या सर्व सदस्यांनी केले, या अभिनव नाट्याविष्काराचे सूत्रबद्ध निवेदन सुप्रिया शेखर तांबे यांनी केले. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या फेसबुक आणि युट्यूबवरील सर्व दर्शकांनी या विशेष नाट्याविष्काराचे यथोचित कौतुक केले.

*आई समजून घेताना*

तसेच ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे यांच्या ‘आई समजून घेताना’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे विवेचन उपक्रमशील शिक्षिका प्रियांका विजय भोगले यांनी प्रभावी सादरीकरणातून केले, आई ही आपल्या कुटुंबातील पहिली स्त्री असते, तिच्यातील संवादाचे सूत्र टिकून ठेवण्यासाठी तिला समजून घेणे आवश्यक आहे, कारण तिच्यापासूनच विकासाचा खरा टप्पा सुरू होतो, दर्पण प्रबोधिनीने हा महिला शिक्षण दिन तिच्या त्यागमय प्रवासाला समर्पित करून हा दिवस संपन्न केला, या विशेष महिला शिक्षण दिनाचे निवेदन श्रमिका श्रीधर तांबे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page