अन्याया विरोधात आक्रमक बना –सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे

अन्याया विरोधात आक्रमक बना –सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे

आचरा पोलीस स्टेशनतर्फे मुलांमध्ये महिला अत्याचारा विरोधात जागृती

आचरा-

अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. या साठी अन्यायाविरुद्ध झाशीच्या राणी सारखे आक्रमक बनून अन्याया विरोधात उभे रहा असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले.

आचरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हायस्कूल मधील मुलांमध्ये बाललैगिक शोषण, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे आदींबाबत मुलांमध्ये जागृती करण्याबाबत ते मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांच्या सोबत न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्षा निलिमा सावंत,स्कूल कमेटी सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,शंकर मिराशी, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, मधुरा माणगांवकर, पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे, श्रीमती पेडणेकर,यांसह अन्य शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना काळे म्हणाले अनिष्ट प्रथांमधून स्त्री पुरुष विषमता निर्माण झाली.यातूनच स्त्रीयांवर अत्याचार सुरू झाले.हि विषमता दूर करण्यासाठीच आणि स्री संरक्षणासाठी विविध प्रकारचे कायदे बनले.यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना काळे यांनी पौगंडावस्थेतील काळात मुलांनी आमिषाला बळी पडून आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा या वयात अभ्यास करत आपले ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी परीश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळेल असे सांगितले या वेळी त्यांनी सायबरगुन्हयांबाबत माहिती देऊन त्यांच्या मेसेजला प्रतिसाद देवू नका असे सांगितले.

अभिप्राय द्या..