कांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार…

कांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार…

मालवण /
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेला तालुक्यातील कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार येत्या २ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत भरविला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा बाजार भरणार असल्याची माहिती कांदळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली आहे.
कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील प्रत्येक शनिवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांप्रमाणे बंद ठेवण्यात आला होता. हा आठवडा बाजार नविन वर्षात २ जानेवारीपासून त्यापुढील प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भक्तनिवास समोरील जागेत भरविण्यात येणार आहे. या आठवडा बाजारास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कोविड- १९ च्या कारणास्तव फेस मास्क, वापरणे व वैयक्तिक सॅनिटायझर स्वतः सोबत ठेवून शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे व्यक्ती व्यक्तीमध्ये १ मीटर अंतर राखूनच खरेदी करायची आहे. तसेच कोविड – १९ संदर्भातील शासनाच्या सर्व सूचनांचे आठवडा बाजारामध्ये तंतोतंत पालन करून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..