मसुरे
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव ६ मार्च २०२१ रोजी संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात संपन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता असते ते देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात जत्रोत्सवाची. हा जत्रोत्सव कोणत्याही तिथी अथवा तारखेवर होत नाही तर देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख निश्चित करण्यात येते. विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात व देवीचे आशीर्वाद घेतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जत्रोत्सवास उपस्थिती दर्शविणाऱ्या व्यापाऱ्यांनी तसेच हॉटेल व्यावसाईकाना या जत्रोत्सवास आपली हंगामी स्वरूपाची दुकाने उभारता येणार नाही आहेत. भाविकांच्या होणा-या गैरसोय बद्दल दिलगीरी व्यक्त करतानाच आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल अशी भाविकांना नम्र विनंती आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.