नागपूर: माहेरून पैसे न आणल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नागपूर मधील नरेंद्रनगर येथील उपेंद्र अपार्टमेंटमध्ये घडली. रूचिता मंगेश रेवतकर (वय ३०),असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून डॉ. मंगेश रेवतकर यांना अटक केली आहे. याप्रकरणात मंगेश यांच्या आईला आरोपी करण्यात आले असून सुनंदा पुरुषोत्तम रेवतकर (वय ५२),असे त्यांचे नाव आहे. रुचिता यांना सहा वर्षांचा मुलगा आहे.

मंगेश रेवतकर हे धंतोलीतील खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत. ते नेहमी रुचिता यांचा माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करत. आज सकाळीही यांच्यात वाद होऊन तो विकोपाला गेला आणि त्यातूनच रागाच्या भरात रुचिता यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मंगेश यांना गळफास लावलेल्या अवस्थेत रुचिता दिसल्या आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. या घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला व पंचनामा करण्यात आला.

रुचिता यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केलीे. माहेरुन पैसे आणण्यासाठी पती व सासू छळ करीत आहेत. त्याला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. चिठ्ठीच्या आधारे तसेच अलका सुरेशराव कवडे (वय ५३ रा. पांढुर्णा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी हुंडाबळीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून मंगेश यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page