राधानगरी तालुक्यातील कोते ग्रुप ग्रामपंचायत मधिल गोतेवाडी येथील प्राथमिक शाळेलगत असणाऱ्या मुख्य चौकातील तुंबलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावर साठले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासन,सरपंच व सदस्यांनी पाठ फिरवल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाळू गोते व युवा कार्यकर्ते प्रकाश गोते यांनी सांगितले.
एक वर्षापूर्वी गटारींचे काम झाले आहे. या गटारींचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. गटारीतून वाहणारे पाणी बाहेर जाण्यासाठी जागा नसल्याने गटाराच्या पाण्याने रस्त्यावर ठीकठिकाणी गुढघाभर पाणी साठले आहे.त्यामुळे नागरिकांना पाण्यातच वाट शोधावी लागत आहे. पाणी बाहेर काढणे गरजेचे असताना पाणी व घाण कोपार्डेकर यांच्या दारात साठल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्या गटारांमुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे येथील नागरिकांना डेंग्यू सदृश्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार असल्याचे प्रकाश गोते यांनी सांगितले.
पुढे प्रकाश गोते यांनी सांगितले की जनतेला बदल हवा होता त्यामुळे तरुणपिढीने सरपंच यांचे पती सचिन पाटील यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भरभरून मतदान दिले पण दोनच वर्षात त्याने भोळ्याभाबड्या नागरीरांचा भ्रमनिरास केला त्यामुळे सर्व लोक त्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असून येणाऱ्या काळात जशासतसा धडा शिकवला जाईल असा इशाराही दिला आहे.

महिला आक्रमक

वाडीत गेले सहा ते सात महिने प्यायला पाणी नाही.नैसर्गिक पाणी असल्याने आता कमतरता नाही पण उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरायला लागत असल्याचे महिलांनी सांगितले.रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय नाही कित्येक महिने बल्ब नसल्याने अंधारातून वाट शोधावी लागत असल्याचे दिसून आले.

सरपंच पतींची उर्मट भाषा

जेष्ठ नागरिक तुकाराम किरुळकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी औषध फवारणी करावी अशी विनंती सरपंच यांच्याकडे केली असता सरपंच अनिता पाटील यांच्या पतीने किरुळकर यांना घरपट्टी व पाणीपट्टी भरा मगच औषध फवारणी करू नाहीतर मरा असे उर्मट उत्तर दिले.कोरोनाच्या काळात हाताला कामधंदा नसल्याने आर्थिक अडचणीस सापडलेल्या नागरिकांना धीर व आरोग्य सुविधा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देणे गरजेचे असताना सरपंच यांचे पती नागरिकांनाच बेईज्जत करत आहेत त्यांना हा अधिकार कुणी दिला याचे उत्तर ग्रामस्थ वरिष्ठांकडे मागत आहेत.यावेळी सुभाष गोते,विठ्ठल गोते,भिकाजी गोते,मोहन किरुळकर, पांडुरंग सागावकर,श्रीपती मरळकर,एकनाथ मरळकर,रंगराव जोगम, भाऊ गोते,मारुती गोते,प्रवीण गोते,अर्जुन मरळकर,अक्षय सागावकर,राजू आरबुने, विलास गोते,हिंदुराव कोपार्डेकर आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page