नवी दिल्ली /-
भारतात १९९० ते २०१९ या काळात बालमृत्यूचा दर घटला, ही आनंदाची बाब आहे, मात्र अजूनही जगातील पाच वर्षांखालील मुलांचे एक तृतीयांश मृत्यू हे भारतात होत असल्याचे दिसत आहे. कोविड १९ साथीमुळे गेल्या काही वर्षांत बालमृत्यू कमी करण्यासाठी विविध देशांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे.
‘लेव्हल्स अँड ट्रेंडस इन चाइल्ड मोरटॅलिटी रिपोर्ट २०२०’ या अहवालात म्हटले आहे, की जगातील बालमृत्यूचे प्रमाण २०१९ मध्ये सर्वात खाली आले. १९९० मध्ये हे प्रमाण १.२५ कोटी होते, ते आता ५२ लाख आहे. गेल्या तीस वर्षांत आरोग्य सेवांनी केलेल्या कामांमुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे. कमी वजन, न्यूमोनिया, अतिसार, मलेरिया या रोगांनी बालमृत्यूचे वाढलेले प्रमाण लसीकरण व इतर उपायांनी घटले आहे. कोविड १९ काळात मूलभूत लसीकरण मोहिमा थांबल्या आहेत.युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार पाच वर्षांखालील मुलांचा मृत्युदर १९९० मध्ये हजार जिवंत मुलांमागे भारतात १३६ होता तो आता ३४ झाला आहे.