अखेर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लढ्याला मिळाले यश.;निर्णयाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले स्वागत

अखेर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लढ्याला मिळाले यश.;निर्णयाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले स्वागत

 

राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वसाधारण व मासिक सभा ऑफलाइन पद्धतीने होणार.

 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभा या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आदेश निर्गमित केला होता. मात्र कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर देखील वारंवार मागणी करूनही या सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. या बाबत जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण तसेच स्थायी व अन्य सभांमध्ये चर्चा होऊन पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने सहभाग घेण्याची मागणी करण्यात आली होती. तशा प्रकारचा ठराव देखील राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. अखेर राज्य शासनाने या ठरावाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वसाधारण व मासिक सभा या पूर्वीप्रमाणेच सभागृहात अधिकार्‍यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टंसिंग च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यास परवानगी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याबाबत ग्राम विकास मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांनी अशा प्रकारच्या सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्या अशी मागणी केली होती. त्यामुळे आता राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा आपले प्रश्न सभागृहात मांडण्याची व संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची माहिती व उत्तरे घेण्याची संधी मिळणार आहे.

याबाबत मीडिया शी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. उशिरा का होईना परंतु सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना पुन्हा एकदा सभागृहात बसून कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लढ्याला अखेर यश मिळाले असेही त्यांनी सांगितले. तसेच सर्व सदस्य व अधिकाऱ्यांनी कोरोना बाबतीत शासनाने घातलेल्या अटी व नियमावलीचे पालन करावे असे आवाहनही केले आहे.

अभिप्राय द्या..