गर्भपातासाठी तगादा लावल्याने तरुणीचा खून

गर्भपातासाठी तगादा लावल्याने तरुणीचा खून

घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत रुग्णालयाच्या फाईल्स, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि पारंपरिक पद्धतीने तपास करत खूनाचा छडा लावला. दोन दिवसांपूर्वी तपोवन परिसरात पोलिसांना एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गर्भपातासाठी पती बनून रुग्णालयात सोबत यावे, यासाठी या तरुणीने तगादा लावल्याने त्रस्त तरुणाने तिचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक बाब पुढे आली.

नाशिकरोड देवळाली येथील झैनब कुरेशी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. देवळाली गावातील नातेवाईक दानिश जावेद कुरेशी (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी (दि.१२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तपोवन-टाकळी रस्त्यावर पुर्वी मारुती वेफर्स समोरील कर्मा गॅलेक्सी इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. युवतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. युवतीची ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खून पूर्वनियोजित करण्यात आला होता. कोणताही पुरावा मागे राहणार नाही. याची काळजी हल्लेखोराने घेतली होती. तरुणीची ओळख पटवणे, नातेवाईक व हल्लेखोराचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शहर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला. घटनास्थळी मिळून आलेल्या रुग्णालयाच्या फाईल, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि पारंपारिक पद्धतीने तपास केला. तपासात तरुणीचा मृतदेह नाशिकरोड देवळाली येथील झैनब कुरेशीचा असल्याचे निष्पन्न झाले. झैनब तीन महिन्यांची गर्भवती असल्याचेही उघड झाले. तिच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली असता देवळाली गावातील नातेवाईक दानिश जावेद कुरेशी (वय २०) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास पुढील तपासासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

५ डिसेंबरला केला खून
तू माझा पती बनून रुग्णालयात नेवून माझा गर्भपात करुन दे, असे वारंवार झैनब कुरेशी दानिश कुरेशीकडे तगादा लावत होती. तू रुग्णालयात आला नाही तर तुझे नाव घेईन, अशी धमकी तिने दानिशला दिली होती. तिच्या तगाद्याला तो वैतगला होता. तपोवनात एक वैद्य जडीबुटीने गर्भपात करुन देतो, अशा बहाण्याने दानिशने तिला ५ डिसेंबरला दुपारी दुचाकीने तपोवनातील निर्जनस्थळी नेले. त्यानंतर संधी साधत गळा आवळून व डोक्यात दगड टाकून तिचा खून केला.

अभिप्राय द्या..