छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे क्राइम पेट्रोल. गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात येतो. त्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमामुळे अभिनेता अनुप सोनी घराघरात पोहोचला होता. त्यामुळे अनुप सोनी हा जणू क्राइम पेट्रोलचा एक चेहरा झाला होता. मात्र, आता यापुढे अनुप सोनी या कार्यक्रमात दिसणार नसून त्याच्या जागी एक अभिनेत्री सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
अनुप सोनी याचा “सावधान रहिए, सतर्क रहिए..”हा संवाद सगळ्यांना तोंड पाठ झाला होता. मात्र, आता या डायलॉगऐवजी ‘न सहमेंगी, न डरेंगी, न रुकेंगी, जाग जाग नारी तू, एक औरत पर वार अब हर औरत का भार’ या नवीन घोषवाक्यासह हा नवा डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
‘क्राइम पेट्रोल’ या कार्यक्रमात अनुप सोनीऐवजी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सूत्रसंचालन करणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीने क्राइम पेट्रोलचा एक प्रोमो शेअर केला होता. यामध्ये क्राइम पेट्रोलचा नवा चेहरा म्हणून दिव्यांका प्रेक्षकांसमोर आपली. “#WomenAgainstCrime दिव्यांका त्रिपाठीसोबत” असं कॅप्शन देण्यात या प्रोमोला देण्यात आलं आहे.
२१ डिसेंबरपासून दिव्यांका क्राइम पेट्रोलच्या नव्या भागात दिसून येणार आहे. या नव्या भागात ती स्त्रियांना जागरुक राहण्याचा संदेश देणार आहे. दरम्यान, दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. दिव्यांका कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते.