लॉकडाऊनच्या काळात रोजगार हिरावलेल्या तरुणीवर भयानक प्रसंग ओढवला. नोकरीसाठी मदत मागितल्यानंतर चौघांनी तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
झूंसी: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात चौघांनी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. तिने आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पीडितेने प्रयागराजच्या झूंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी चारपैकी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणी प्रयागराजच्या जौनपूर परिसरात राहते. ती ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होती. लॉकडाऊनच्या काळात काम बंद झाले. तिने काम शोधण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिची ओळख काही जणांशी झाली. तिने त्यांच्याकडे मदत मागितली.
नोकरी देतो असे सांगून एका तरुणाने तिला हॉटेलवर बोलावले. तो आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर ती थेट झूंसी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांना आपबीती सांगितली. चौघांविरोधात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई सुरू केली. जितेंद्र नावाच्या तरुणाला अटक केली. तर त्याचे तीन साथीदार फरार झाले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.