नगर: केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. गेल्या अनेक दिवसांपासून कोतकर फरारी आहेत.
मागील महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगावमध्ये हे हत्याकांड घडले होते. ७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींकडून कोतकर हिच्याबद्दल माहिती तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने कोतकरचेही नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हापासून कोतकर फरारी असून आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला होता. सुरुवातीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
या अर्जावर जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. केदार केसकर यांनी तर आरोपीतर्फे अॅड. नितीन गवारे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक होऊन त्यांच्याविरूद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ, महावीर मोकळे, रवींद्र खोल्लम, संदीप गिऱ्हे, विशाल कोतकर, भानुदास एकनाथ कोतकर, भानुदास महादेव कोतकर ऊर्फ बीएम, पिस्तूल पुरविणारा बाबासाहेब केदारे या आठ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर व इतर काही जण एकमेंकाशी फोनवरून संपर्कात असल्याने ते हत्येच्या कटात सहभागी असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
दोषारोपपत्र दाखल झालेले असले तरी सीआयडीचा तपास सुरूच आहे. बराच काळ फरारी राहिल्यानंतर कोतकरने अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. निवडणुकीचा वाद आणि राजकीय संदर्भ असल्याने ही घटना राज्यभर गाजली आहे. आरोपींच्या अटकेसाठी विविध आंदोलनेही झाली होत.