आचरा-
समाजमनाचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटवणारया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवोदित लेखकांच्या लेखनीतून परिचय करून देणारी लेखमाला सिंधुसाहित्य सरीता या नावाने पुस्तक रुपाने रामेश्वराच्या सानिध्यात प्रसिद्ध होत आहे ही कौतुकास्पद बाब असून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत या पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर यांनी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी व्यक्त केले.यावेळी त्यांच्या सोबत देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी, कपिल गुरव, रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे मंदार सांबारी, सुगंधी गुरव,मधुरा माणगांवकर, सदानंद कांबळी, अनिरुद्ध आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या नवोदित सोळा साहित्यिकांनी सुरेश ठाकूर यांच्या संपादनात तयार केलेल्या सिंधुसाहित्यसरीता या पुस्तकाचे प्रकाशन आचरा साहित्य नगरीत इनामदार श्री देव रामेश्वर चरणी पुस्तक अर्पण करून करण्यात आला. या पुस्तकात कोमसाप च्या नवोदित लेखकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रसिद्ध साहित्यिक तर काही प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा जिवनपट उलगडून दाखवताना त्यांच्या साहित्याची साहित्य रसिकांना नव्याने ओळख निर्माण करून दिली आहे यात बॅ नाथ पै,आ.सो.शेवरे, वसंतराव आपटे, कवयित्री प्रतिभा आचरेकर,पा ना मिसाळ,ल मो बांदेकर, डॉ विद्याधर करंदीकर, डॉ वा वि मिराशी,आ.द.राणेगुरुजी,जी टी गांवकर,विद्याधर भागवत,विजय चिंदरकर,आ ना पेडणेकर, श्रीपाद काळे, बाळकृष्ण प्रभूदेसाई, डॉ वसंत सावंत,प स देसाई,लुई फर्नांडिस,हरीहर आठलेकर,वसंत म्हापणकर,जनयुगकार श्री स खांडाळेकर,नाट्यकार मामा वरेरकर या साहित्यिकांचा समावेश आहे. या पुस्तकाला प्रस्तावना मधुसूदन नानिवडेकर यांची आहे. या पुस्तकाला लेखी शुभेच्छा देताना मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटले आहे की सिंधुसाहित्यसरीता हा ग्रंथ देवदिपावली दिवशी कैवल्य धाम रामेश्वराच्या सानिध्यात प्रकाशित होत आहे ही बाब मला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या परीवाराला निश्र्चितच समाधान देणारी असल्याचे म्हटले आहे.अण्णा गुरव यांच्या अंगणात रंगलेल्या प्रकाशना नंतरचे पुस्तकाचे अंतरंग या कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश ठाकूर यांनी तर आभार बाबाजी भिसळे यांनी मानले.
सिंधुसाहित्यसरिता ई-बुक स्वरूपातही
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे सिंधुसाहित्यसरिता हे पुस्तक देवदीपावलीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतील उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ या नावाची लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही लेखमाला साकार झाली होती. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती म्हणजे हे पुस्तक आहे. सत्त्वश्री प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक गुगलवर ई-बुक स्वरूपातही प्रकाशित झाले आहे. त्यामुळे ही अक्षरपताका डिजिटल विश्वातही पसरणार आह.
ई-बुक खरेदीची लिंक : https://bit.ly/2IlFV7C)