कुकरच्या भांड्याने डोक्यात घाव घालून एका बारबालेची हत्या केल्याची खळबळजनक घटना खारघर सेक्टर १० येथे घडली आहे. रजिया उर्फ प्रिया (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. प्रणित तरपे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक करण्यात आलेला प्रणित तरपे हा विवाहित असून तो सदर मृत बारबालेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली आहे.

असा घडला गुन्हा!
प्रणित तरपे हा पहिल्या पत्नीसोबत खांदा कॉलनी येथे राहत होता. त्याने मयत रजिया उर्फ प्रिया प्रणित तरपे सोबत दुसरे लग्न केले. त्यांना २ महिन्यांची मुलगी देखील आहे. ती खारघर सेक्टर १० येथे राहत होती. दरम्यान, रजिया प्रणितला पहिली पत्नी आणि कुटुंबियांना त्यांच्या संबंधांबद्दल सांगेन असं वारंवार धमकी देत असल्याने त्याचाच राग मनात धरून रजियाची हत्या केल्याचे प्रणितने कबूल केले आहे. शनिवारी १२ डिसेंबरला संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर मयत रजिया हिने विष प्यायल्याचे सांगत स्वतः पती प्रणित यानं एम जी एम रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टर यांनी खारघर पोलीस ठाण्याला वरील घटनेबाबत कळवताच पती प्रणित फरार झाला. त्याचा तपास करत असताना आरोपी बाबत माहिती मिळताच खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक विमल बिडवे, पोलीस उपनिरीक्षक जगताप आणि इतर पोलीस यांच्या पथकाने आरोपी पळून जाताना फिल्मीस्टाईलने अटक केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page