मेकअप आर्टिस्टला पाठवले अश्लील मेसेज; तरुणाला केली अटक

मेकअप आर्टिस्टला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या युवकाला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी चार महिन्यांनी अटक केली आहे. आरोपी युवक हा एका कारच्या शोरूममध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई: २५ वर्षीय मेकअप आर्टिस्टला मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी रविवारी २१ वर्षीय तरुणाला अटक केली. आरोपीला पीडितेचा मोबाइल क्रमांक त्याच्या मित्राकडून देण्यात आला होता. मोबाइल फोन लोकेशनवरून तो जोगेश्वरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवण्यात आल्याची तक्रार तरुणीने जुलैमध्ये केली होती. संबंधिताने मेसेज पाठवल्यानंतर सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावरून मेसेज पाठवला. एका मित्राकडून तुझा मोबाइल क्रमांक मिळाला असल्याचे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते. एका रात्रीचे पाच हजार रुपये देतो अशा आशयाचा मेसेज त्याने केला होता. अखेर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, त्याचा फोन अॅक्टिव्ह नसल्याने मोबाइल लोकेशन मिळू शकले नाही. मात्र, पोलीस त्यावर नजर ठेवून होते. रविवारी त्याचा फोन अॅक्टिव्ह झाल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून त्याला एस. व्ही. रोड येथून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी एका कार शोरूममध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page