एका ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये खळबळ माजली आहे. मागील दोन दिवसांतील ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

महाराजगंज/ गोरखपूर : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. एका ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. तीन दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे की, त्याची हत्या झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

अनिकेत यादव हा गोरखपूर येथून महाराजगंजच्या पनियरा परिसरात राहणाऱ्या आपल्या अत्याच्या घरी आला होता. ११ डिसेंबरला संध्याकाळी तो बाहेर खेळत असताना, अचानक बेपत्ता झाला. नातेवाइकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, मुलगा सापडला नाही.

अनिकेतच्या अत्याने तो बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी पनियरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तर मुलाच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याचे पोस्टर ठिकठिकाणी लावले होते. पोलिसांचे पथकही त्याचा विविध ठिकाणी शोध घेत होते. त्याचवेळी सोमवारी रोहिंन नदीपात्रात त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्याची हत्या झाली असावी, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page