मसुरे 

कोणताही मोठा आजार सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यावर अचानक उदभवल्यास त्या कुटुंबावर अस्मानी संकट कोसळते. आर्थिक ओढाताणी बरोबरच कुणाच्यातरी ओळखीने तातडीने उपचारासाठी मग सुरु होते ती धावाधाव. सध्याच्या कोरोना काळात तर मुंबई सारख्या शहरातील मोठ्या दवाखान्यात ऊपचार घेणे सुद्धा अशक्यप्राय गोष्ट बनली होती. परंतु या अशा कठीण काळात सुद्धा सिंधूदुर्गचा एक सुपुत्र आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचा आधारवड बनला आहे. मालवण तालुक्यातील धामापुर गावचे संजय गावडे हे ते नाव. मुलुंड येथील प्लॅटीनम हॉस्पिटल येथे जनरल मॅनेजर या उच्च पदावर काम करताना सामाजीक बांधीलकीचे भान राखत अनेक गोर गरीब रुग्णांच्या मोठ मोठ्या शस्त्रक्रीया अगदी मोफत करुन त्यांना जिवदान देण्याचे काम ते करत आहेत.
धामापुर गावचे संजय गावडे यांची आणखी एक ओळख म्हणजे ते एक उत्तम भजनी बुवा आहेत. सन २००९ मध्ये प्लॅटीनम हॉस्पिटल येथे सेवा चालु केल्या नंतर २०१६ साली त्यांची जनरल मॅनेजर म्हणुन नेमणुक झाली. हृदय विकाराचा कोणताही रुग्ण वैद्यकीय सेवेची गरज असल्याची त्याना माहीती मिळताच तातडीने अशा रुग्णास हॉस्पिटल मध्ये दाखल करण्या पासुन रुग्ण ठणठणीत बरा होई पर्यंत सतत कार्यरत असतात ते संजय गावडे. आपल्या पदाचा कोणताही मोठेपणा न मिरवता आपल्या जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णास वेद्यकीय सेवा मिळावी हाच हेतु त्यांचा असतो. सध्याच्या धावपळीच्या युगात समाजामध्ये मानव रुपात वावरणारा परमेश्वर म्हणुन त्यांची ओळख आहे ती याच कारणा मुळे. भजन सांप्रदायाच्या माध्यमातुन हरीनामाची भक्ती करतानाच सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे. अगदी एन्जोग्राफी पासुन बायपास सर्जरी पर्यंत लाखो रुपयांची ऑपरेशन्स अल्प खर्चात किंवा मोफत करुन देण्यासाठी ते प्रयत्नशिल असतात. कळवा- मुंबई येथे राहणारे संजय गावडे नवोदित भजनी कलाकाराना मोफत मार्गदर्शन करतात.
मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर म्हणुन काम करताना अनेकाना नोकरी देणे, संकट काळात मदत करणे, गोरगरीबाना साहीत्य वाटप करणे असे अनेक उपक्रम ते नेहमीच करत असतात. ज्या जिल्ह्यातुन आपण मुंबईत आलो त्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे हॉस्पिटल उभारले जावे ही त्यांची मोठी इच्छा आहे. व त्या अनुषंगान त्यांचे प्रयत्न चालु आहेत. आरोग्यासारख्या महत्वाच्या सेवेत कोरोनाच्या काळात सुद्धा स्वत:च्या जिवाची पर्वा न करता गोर गरीबांसाठी राबणाऱ्या संजय गावडे यांची रुग्ण सेवा अभिमानास्पदच म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page