सिंधुदुर्गनगरी /-

 

सेंट्रल कौन्सिलिंग ऑफ इंडियन मेडिसिनच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युक्तर शिक्षणात 58 ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने या विरोधात 19 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांनीही सक्रिय सहभाग घेत दिवसभर दवाखाने बंद ठेवले व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकऱ्यांना सादर केले.

जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, डॉ. वैद्यराज सवदत्ती, डॉ. संजय निगुडकर, डॉ. अमोघ चुबे, डॉ. जी. एस. कुलकर्णी आदीनी जिल्हाधिकारयांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की सेंट्रल कौन्सिलिंग ऑफ इंडियन असोसिएशनच्या (सीसीआयएम) अधिसूचनांमध्ये अनेक त्रुटी असून सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय शस्त्रक्रियांचे नामांतर संस्कृत शब्दात करून आणि या सर्व मूळ आयुर्वेद शस्त्रक्रिया असल्याचा खोटा दावा केला आहे. तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद पदव्युत्तर विद्यार्थी आधुनिक वैद्यकाच्या विविध विशेष शाखांमधल्या शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरणार आहेत.

थोडक्मयात, एकच आयुर्वेदिक वैद्य ऍडिक्सचे ऑपरेशन करेल, तोच किडनी स्टोन, कानाची शस्त्रक्रिया करेल, डोळ्यातील मोतीबिंदूही तोच काढेल, त्याला पिताशयातील खडा काढण्याची दुर्धर शस्त्रक्रियाही करण्यासही परवानगी असेल आणि तोच रुग्णांच्या दातांची अवघड शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरेल. आधुनिक वैद्यक शास्त्रातील ज्ये आणि कुशल शल्यचिकित्सकांनाही शस्त्रक्रियेतील एवढय़ा विस्तृत निवडीची कायदेशीर परवानगी नाही. तर आयुर्वेदाच्या वैद्यांना एम. एस. अशी पदवी मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना आपण तज्ञ ऍलोपॅथिक डॉक्टरांकडून उपचार घेत आहोत की सीसीआयएमचा हा कोर्स केलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हे न समजल्यामुळे गोंधळात पडण्याची वेळ येणार आहे.
आय. एम. ए. ची भूमिका
आयएमएचा हा लढा आयुर्वेदविरोधी नाही किंवा आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधीसुद्धा नाही. आमचा विरोध वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणार्या मिक्सिपॅथीविरोधी आहे. आयुर्वेदातील ऍलोपेंथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचीन आणि महान वैद्यकीय शाखेचा विकास खुंटवेल आणि काही काळात त्यांच्या अस्तित्व नाहीसे करू शकेल. कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे एक नाजूक प्रक्रिया असते. जी जीवन आणि मृत्यू यांच्यामधली सूक्ष्म सीमारेषा असते. आधुनिक वैद्यकीय सर्जन शरीरशास्त्र, शरीर क्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि ऍनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो. पदव्युत्तर पदवी मिळवण्यापूर्वी अनुभवी आणि ज्ञानी आणि व्यासंगी प्राध्यापकांच्या हाताखाली शेकडो शस्त्रक्रिया करतो. गॅस्ट्रोइंटेस्टाईनल शस्त्रक्रिया आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यासाठी आणखी काही वर्षे झटून काम करतो. याची तुलना आयुर्वेद अभ्यासक्रमाशी करता येणार नाही. कारण त्यातल्या कफ, वात, पित्त अशा भिन्न विचारांच्या मूलभूत संकल्पना आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच शुक्रवारी देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टर सहभागी होत पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दवाखाने बंद ठेवण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली.
आय. एम. ए.’च्या या आहेत मागण्या
सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या त्वरित रद्द कराव्यात. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल, यावर सरकारने भर द्यावा, अशा मागण्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page