– आंबोली येथे 11 डिसेंबर जैवविविधता दिन साजरा –
वैभववाडी:सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे तसेच आहे ती निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन सुभाष पुराणिक यांनी केले.
माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने शुक्रवार ११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिनाच्या निमित्ताने महादेवगड पाॕईंट,आंबोली येथे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वत पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन करताना कोकणचे सुपुत्र, सिंधुदुर्ग विभागाचे माजी सहाय्यक वन संरक्षक आणि पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक बोलत होते.
कोकण आणि त्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग म्हणजे जैवविविधतेचा सागर आहे. येथील सजीवसृष्टीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज विविकासाच्या नावाखाली निसर्ग संपत्तीची हानी होत आहे. वनविभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून वनसंरक्षण केले जाते. तसेच माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाची चळवळ वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. या संस्थेची स्थापना करुन एक चांगली सुरुवात केल्याबद्दल संस्थेला व संस्थेच्या कार्याला सुभाष पुराणिक यांनी शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन मान्यवरांच्या शुभहस्ते विधीवत पर्वत पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक ११ डिसेंबर हा युनोने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून २००२ मध्ये जाहीर केला आणि २००३ पासून ११ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी सर्वत्र साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्यावतीने सर्व संलग्नित जिल्हा संस्था यांनी पर्वत पूजन करून हा दिवस साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचा उद्घाटन समारंभ आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिन असा संयुक्त कार्यक्रम घेत असून हा एक सुवर्णयोग असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सचिव प्रा.एस.एन.पाटील यांनी सांगितले.
यावेळी बाबल अल्मेडा, अनिल पाटील, डॉ.बापू भोगटे, रमाकांत नाईक, हेमंत ओगले, सदस्य डॉ.संजीव लिंगवत यांनी मनोगते व्यक्त करुन संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. इतिहास, गिर्यारोहण आणि पर्यटन यांचा समन्वय साधून या क्षेत्रात एक चांगले काम उभे राहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र घेऊन चांगले काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश नारकर यांनी केले. उपाध्यक्ष डाॕ.कमलेश चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.
दुसऱ्या सत्रात डाॕ.कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांगरतास येथे रॕपलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग, बर्डिंग व व्हॕली क्राॕसिंग इत्यादी विविध क्रीडा प्रकार करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्थानिकांसह जिल्ह्यातील हर्षल नाडकर्णी, सदस्य डाॕ.गणेश मर्गज, अतिश माईणकर, डॉ.निहाल नाईक, मायकल डिसोजा, उत्तम नार्वेकर,संतान अल्मेडा, राजेश आमृसकर, संदेश गोसावी, देवेश रेडकर, कोमल रेडकर, प्रथमेश धुरी, बाळकृष्ण गावडे, पवन गावडे, तुकाराम गावडे, प्रतीक गावडे, ऋतिक गावडे, दीपक कदम, राहुल चव्हाण तसेच बाबल अल्मेडा टिम, आंबोली रेस्क्यु टिम, सिंधुदुर्ग अॕडव्हेंचर टिम व शिवप्रेमी सिंधुदुर्ग टिमचे प्रतिनिधी व निसर्गप्रेमी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page