पुण्यातील कोथरूडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्या केअरटेकरने शस्त्राचा धाक दाखवून लुटले. महिलेने आरडाओरड केली असता, तिच्यावर वार केले. यात महिला जखमी झाली आहे.

कोथरूडमधील जय भवानी नगर येथे राहणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याकडील केअरटेकरने शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्येष्ठ महिलेच्या हातावर त्याने कोयत्याने वार केले. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ७४ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार केअर टेकर संदीप हांडे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जय भवानी नगर येथील गुरुराज हाउसिंग सोसायटीत पत्नीसोबत राहतात. आरोपी हा त्यांच्याकडे केअर टेकर म्हणून काम करतो. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी हांडे हा खिडकीचे गज कापून तक्रारदार यांच्या घरात शिरला. त्याच्यासोबत दोन साथीदार होते. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावून धाक दाखविला. तक्रारदार यांच्या पत्नीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या हातावर कोयत्याने वार केले. धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोपी सीसीटीव्हीत कैद

तक्रारदार यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तर मुलगी बावधन परिसरात राहण्यास आहे. सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी त्यात कैद झाले आहेत. कोथरूड पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page