मुंबईतील लेडी डॉन कुख्यात करीमा आपा हिला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. मचमच टोळीशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबई उपनगरातील स्लम क्वीन म्हणून कुख्यात असलेल्या करीमा मुजीब शाह उर्फ करीमा आपा हिला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. तिच्यासह तीन हस्तकांनाही बेड्या ठोकल्या आहेत. अवैध शस्त्र पुरवल्याच्या प्रकरणात तिचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

फहिम मचमच टोळीतील गुंडांना अवैध शस्त्र पुरवठा केल्याप्रकरणात करीमा आपाचं नाव समोर आलं होतं. गेल्याच आठवड्यात खंडणीविरोधी पथकाने मचमच टोळीतील तिघांना अटक केली होती. विनोद गायकवाड, फझलू रेहमान उर्फ मुज्जू आणि मोहम्मद शाह यांना कांजूरमार्ग येथून अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या टोळीशी करीमा आपाचे ‘कनेक्शन’असल्याची माहिती रेहमानच्या फोनमधून मिळाली.

कोण आहे करीमा आपा?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा एकेकाळी दबदबा होता. हसीना पारकरला लोक हसीना आपा या नावाने ओळखत होते. कालांतराने तिची मुंबईवरची पकड सैल होत गेली. त्याचदरम्यान एका नाव चर्चेत आले. करीमा आपा. करीमा रातोरात अवैध झोपड्या उभारून ती विकायची. तसेच तिच्यावर शस्त्रे खरेदी-विक्री करण्याचाही आरोप आहे. खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही तिचे नाव समोर आले.

सहा वर्षांपूर्वी महिलेची हत्या केल्याचा आरोप

मुंबईत तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पंतनगर पोलिसांनी तिला तडीपारही घोषित केले आहे. मात्र, पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करत ती वर्सोवा परिसरात राहत होती. माहिती मिळाल्यानंतर करीमा आपाला पोलिसांनी वर्सोवा परिसरातून अटक केली. २०१४ मध्ये तिने झोपडीवरून झालेल्या वादातून एका महिलेची हत्या केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. आपल्या परिसरात ती ‘स्लम क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने तिला हप्ता मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिला कोर्टात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page