वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या बाजूला साकारलेल्या तालुक्याचा ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा सांगणा-या विविध ठिकाणांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेल्या आकर्षक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर‘ कलादालनाला विविध क्षेत्रांबरोबरच राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींनी भेट देत या कलादालनाबद्दल प्रशंसनीय उद्गार काढले आहेत.
माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस,आमदार रविद्र चव्हाण यांनी या कलादालनाची पहाणी केली. त्यावेळी ते म्हणाले की, तालुक्याला लाभलेल्या सांस्कृतिक वैभवाचे जतन नगरपरिषदेने कलादालनाच्या निमित्ताने जतन केले आहे. ज्या मातीत अनेक थोर पुरुषांचे पाय लागले व ज्यांनी या मातीत जन्म घेतला अशा सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अगोदरपासून स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ ख-या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वेंगुर्ला नगरवाचनालयालात रोवली हे आत्ताच्या पिढीला समजणे महत्त्वाचे आहे आणि ते या कलादालनात समाविष्ट केले आहे हे उल्लेखनीय आहे. तसेच वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ म्हणून कसे योग्य हे या कलादालनातील प्रत्येक छोटेखानी प्रतिकृतीतून आपण दाखविले आहे. मला असं देखणं आणि माहितीपूर्ण कलादालन पहाण्याचा योग मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समाजतो. तसेच प्रत्येक पर्यटकांनी हे कलादालन पहावं असे आवाहनही त्यांनी केले.
तर महाराष्ट्रातील तमाम नगरपरिषदेपैकी सर्वात स्वच्छ, पारदर्शक, जागरुक, सांस्कृतिक चळवळ जपणारी, महाराष्ट्राच्या भूमिला थोर विभूती देणारी वेंगुर्ला ही पावन भूमी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी २४ ऑक्टोबरला दिलेल्या भेटीत व्यक्त केले.