वाहन कर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री यांच्यासमवेत आ. वैभव नाईक,संदेश पारकर व अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक संपन्न..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ मार्च २०२० पर्यंत वाहन कर घोटाळ्यातील त्या वाहनांचा कर भरून घेऊन ती वाहने नियमित केली जाणार आहेत. तसेच या कर घोटाळ्यात जे अधिकारी दोषी आहेत त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार त्याचबरोबर घोटाळ्यातील रक्कमेच्या वसुलीची कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी जाहीर केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस परिवहन कार्यालयामध्ये वाहनांची नोंदणी होऊन ऑनलाईन कर भरल्यानंतर झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री ना. अनिल परब यांच्या समवेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली.यावेळी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त संदेश चव्हाण,सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परीवहन कार्यालयामार्फत वाहन रजिस्ट्रेशन व आकर्षक नंबरप्लेट चे काम करून देणाऱ्या खाजगी व्यक्तीकडून बनावट खोटे वाहन परवाने देऊन रजिस्ट्रेशनची व आकर्षक नंबरची रक्कम स्वीकारली गेली मात्र त्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले.ती वाहने रस्त्यावर फिरविता येणार नाही असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी वाहन मालकांच्या बाजूने भूमिका घेत.ती वाहने अडवू नयेत असा इशारा दिला होता.
तसेच याबाबत आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करून वाहन कर घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्र्यांच्या दालनात बैठक झाली त्यामध्ये आमदार वैभव नाईक,संदेश पारकर यांनी कर घोटाळ्याबाबत चौकशी करण्याची मागणी करत ती वाहने बीएस ४ प्रणालीतील असून त्यांची नोंदणी बंद झाली आहे.या घोटाळ्यात सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.याकडे लक्ष वेधले. तरी त्या वाहनांची नोंदणी करून देण्याची मागणी केली.
त्यावर ना. अनिल परब यांनी वाहन कर घोटाळ्यातील वाहनांचा कर भरून घेऊन वाहने नियमित केली जाणार आहेत. तसेच या कर घोटाळ्यात जे अधिकारी दोषी आहेत त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार त्याचबरोबर घोटाळ्यातील रक्कमेच्या वसुलीचीही कारवाई केली जाणार असल्याचे बैठकीत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page