आचरा/अर्जुन बापर्डेकर
व्हाटस अॅप चा वापर चांगल्या हेतूने केल्यास त्यातून समाजोपयोगी कामे घडू शकतात.याचा प्रत्यय आचरा येथे आला. आचरा गाउडवाडी येथील युवकांनी बनविलेल्या संभादेवी वाडी विकास व्हाटस् अॅप गृप वर केवळ मनोरंजन करत न बसता या गृपच्या माध्यमातून निधी गोळा करत श्रमदानातून निवारा शेड उभारली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे.कोकणातील प्रसिद्ध गणेशोत्सवही या महामारीत झाकोळून गेला. त्यामुळे गणेश उत्सव काळात ना वाडीतील आरती ना भजने अशा मुळे केवळ घरात बसून असलेल्या गाऊडवाडीतील लहान थोर मंडळीनी एकत्र येत काही समाज विकासाची कामे करावी या हेतूने एक व्हाट्स अँप ग्रुप तयार केला. वाडीतील प्रसिद्ध संभादेवीच्या नावाने या गृपचे नामकरणही केले गेले. आचरा बंदर रोडवर मिराशी वाडी फाटा वगळता एकही निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना निवारयासाठी फार त्रास होत होता. गाउडवाडीतील वयोवृद्ध ग्रामस्थांनाही बस किंवा ऑटोरिक्षाची प्रतीक्षा करताना तळपत्या उन्हात किंवा पावसात उभे राहावे लागत होते. ही गरज ओळखून गाउडवाडी येथे निवाराशेड बांधण्याचे ठरविले. या साठी गृप वर चर्चा झाली.यातूनच वाडीतील एक मुंबईस्थीत ग्रामस्थ नागेश नागवेकर यांनी एस.टी. थांबा नजीक, स्वतःची जागा, आपले वडील शंकर उर्फ नाना नागवेकर यांच्या स्मरणार्थ विनामोबदला देण्याचे जाहीर केले त्याच बरोबर या शेडसाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी रुपये 10000/- इतकी रोख रक्कम देऊ केली. त्यांच्या या सहकार्याने प्रोत्साहित होत वाडीतील मुले कामाला लागली .त्यांनी परिसर स्वच्छ केला आणि बांधकामाला सुरुवात केली. स्वतः काही रक्कम स्वतःच्या खिशातून जमा केली त्यानंतर वाडीतील मुंबईस्थित व्यक्तींनी आपल्याला जमेल तसा आर्थिक हातभार लावला, आणि शेडचे काम पूर्ण झाले . शनिवारी सायंकाळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोशल डिस्टंस पाळत या वाडीतील रहिवासी आणि चार्टर्ड अकाउंटन जगदीश नागवेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि नमिता नागवेकर यांच्या हस्ते फित कापून या निवारा शेडचे उद्घाटन केले गेले. या वेळी गाउडवाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.