निगुडेतील शेतकर्‍यांवर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची आली वेळ.; शेतकर्यांमधुन संताप व्यक्त..

निगुडेतील शेतकर्‍यांवर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची आली वेळ.; शेतकर्यांमधुन संताप व्यक्त..

सावंतवाडी /-

निगुडे येथे महामाया दूध संस्था शाखेमार्फत होणारे गोकुळचे दूध संकलन बंद करण्याचे आदेश जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यांनी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दुकानगाळ्यातही संकलन करण्यास मनाई केल्याने भर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली आहे. जिल्हा दुग्ध विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

पेंढूर (ता. वेंगुर्ले) येथील महामाया दुध संस्थेमार्फत निगुडे येथे शाखा स्थापन करुन दूध संकलन करण्यात येत होते. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांची चांगली सोय झाली होती. दूधाला चांगला दर मिळत असल्याने दूध उत्पादनातही वाढ झाली होती. मात्र, जिल्हा दुग्धविकास विभागाच्या अनास्थेमुळे दूध संकलन बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शासनाकडून विविध अनुदानित योजना जाहीर केल्या जातात. मात्र, संबंधित विभागाची मानसिकता नसेल तर योजना निरर्थक ठरतात. असाच प्रकार निगुडेत घडला आहे. शेतकर्‍यांमधील अंतर्गत वादानंतर शेतकरी महेश सावंत यांनी दूध संकलन बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर दुग्धविकास अधिकार्‍यांनी दूध संकलन बंद करण्याचे आदेश दिले होते.दूध संकलन सुरु असलेल्या दुकानगाळ्यातही संकलन करण्यास अधिकार्‍यांनी मनाई केल्याने शेतकर्‍यांवर भर रस्त्यावरच दूध विक्री करण्याची पाळी आली आहे. दुग्ध विकास अधिकार्‍यांच्या या निर्णयाबद्दल शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अभिप्राय द्या..