▪️शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची फार्मसी पदवी प्रदान..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये चौथा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये बी.फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या यावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कुडाळ येथील चार्टर्ड अकाउंटंट केशव फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, उत्तुंग भरारीचे संस्थापक नितीन पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ.विजय जगताप आदी उपस्थित होते.

या समारंभात शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या संकेतानुसार मान्यवरांनी पारंपारिक पगडी पोशाख व विद्यार्थ्यांनी पदवी पोशाख परिधान केला होता. पालकवर्गाला निमंत्रित केल्याने सर्व पालकांना हा गौरवास्पद क्षण अनुभवता आला.

केशव फाटक यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी त्रिसूत्री कानमंत्र दिला. यामध्ये कामाच्या महत्वानुसार प्राधान्यक्रम ठरविणे, संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित करणे व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर इतरांविषयी कृतज्ञता भाव जपणे या तीन गोष्टींचा समावेश होता. ऍड.अस्मिता सावंतभोसले यांनी अर्थार्जनासाठी आजीवन शिक्षणाचे महत्त्व विषद केले.

दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील उत्तुंग भरारी या संस्थेचे संस्थापक नितीन पाटील यांनी ‘सकारात्मक दृष्टिकोनाचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणाली जोशी व प्रा. नमिता भोसले तर आभार प्रदर्शन प्रा.तुषार रुकारी व प्रा. गौरवी सोन्सुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page