कुडाळ /- समील जळवी.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार बदलाचे वारे वाहू लागले आहेत मात्र आता शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपला साथ देणार अशी चर्चा कुडाळ शहरात सुरू आहे ही साथ राजकीय पक्ष नसून मैत्रीच्या आणि समाज भावनेतून दिली जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांवर संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे पण महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार सव्वा वर्षांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार की भाजपची याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक झाल्यावर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आणि निवडून आलेल्या दोन काँग्रेसच्या नगरसेवकांना पहिल्या अडीच वर्षांमध्ये नगराध्यक्ष पद देण्याचे कबूल केले या दोन नगरसेवकांसाठी प्रत्येकी सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आला नगराध्यक्ष आफरीन करोल यांचा कालावधी १४ मे रोजी संपत आहे तसेच शिवसेनेकडून उपनगराध्यक्ष पदासाठी तोच फॉर्मुला ठरविण्यात आला त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाचाही दिलेला कालावधी संपत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बदलाचे वारे वाहत असताना आता नवा फॉर्मुला कुडाळमध्ये उदयाला येत आहे हा फार्मूला म्हणजे मैत्री आणि समाज असा आहे. आपल्या समाजाची नगराध्यक्ष पदावर असली पाहिजे काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पक्ष विसरून समाजाच्या व्यक्तीला पद देण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. समाजाभोवती फिरणाऱ्या या राजकारणाचा फटका इतर नगरसेवकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षापेक्षा समाजाला महत्त्व देण्याचे ठरवले आहे‌. त्यामुळे येत्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीमध्ये शिवसेनेच्या काही नगरसेवकांची भाजप नगरसेवकांना साथ मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा कुडाळ शहरात जोरदार सुरू आहे आता महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page