कुडाळ /-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भास्कर जाधव यांच्या विरोधात मंगळवारी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांतता आणि वाहतूक नियम भंगांचा ठपका

कुडाळच्या येथील भाजपचे पदाधिकारी तुकाराम चंद्रकांत साईल यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या विरोधात आणि आ. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून भास्कर जाधव यांनी तहसीलदार कार्यालयाच्या जवळ असलेल्या बाल रुग्णालयाच्या शांतता क्षेत्रात सभा घेऊन शांततेचा आणि वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचा भंग केला आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

राणेंची बदनामी आणि चिथावणी देणारे वक्तव्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे, बँनर तसेच ज्वालाग्राही पदार्थ असलेल्या पेटत्या मशाल हातात घेऊन मोर्चा काढला. या सभेत भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचे हनन होईल अशा आशयाचा उल्लेख करत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. भास्कर जाधव यांच्या भाषणामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून राणे यांनी बदनामी झाली आहे. तथापि, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध जनमानसात बदनामी करणे, चिथावणी देणे, दोन राजकीय पक्षांमध्ये हिंसेची स्थिती निर्माण करणे या कारणांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा,’अशी तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

भास्कर जाधवांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल

भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भास्कर जाधव यांच्या विरोधात भा.द.सं. 1860 अंतर्गत कलम 153, 505(1)(क), 500, 504 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page