कुडाळ /-

“ज्या देशातील लोकांचे आरोग्य चांगले असते तो देश वेगाने प्रगती करू शकतो .हे लक्षात घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आयुष्यमान भारत मिशन’ अंतर्गत प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना मध्ये सहभाग नोंदवत बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेने जनसामान्यांसाठी जे ‘जन औषधी मेडिकल’ सुरू करून समाजासमोर आदर्श घालून दिला आहे ;तो स्तुत्य आहे .”असे उद्गार केंद्रीय पर्यटन व बंदरे ,जहाजबांधणी, जलमार्ग केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. ते कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्स च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते .त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैशाअभावी देशातील कुणाचा मृत्यू होऊ नये .त्यांना वेळेवर स्वस्त व माफक दरात औषधे मिळावीत ,त्यांना उपचारासाठीचा खर्च मिळावा यासाठी “आयुष्यमान भारत मिशन “सुरू केलं. व गरिबांना वाजवी किमतीमध्ये औषधे मिळावी यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना सुरू केली आहे. त्याला प्रतिसाद देऊन कोरोनाच्या काळात समाजासाठी उत्तम काम केलेल्या कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने जन औषधी योजनेअंतर्गत स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करणारं जन औषधी मेडिकल स्टोअर्स सुरू करून अनेकांसमोर एक उत्तम आदर्श ठेवलेला आहे . हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे .या उपक्रमात त्यांनी व त्यांचे प्राध्यापक यांच्या सहकार्याने नर्सेस स्टुडंट्सनी जे काम केले तेही फार महत्त्वाचे आहे.मोलाचे आहे. नर्सेस स्टुडंट्सनी हे काम अतिशय उत्तमरित्या पार पाडण्यासाठी उत्तम प्रशिक्षण घ्यावे, आर्थिक उन्नती बरोबर लोकांनाआरोग्य विषयक सेवा देऊन समाजऋण फेडावे. असे सांगत खेड्यापाड्यातील लोकांचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत ज्या अनेक सवलतींची, मदतीची तरतूद केलेली आहे; त्याचा उपस्थितांचा परिचय करून देऊन त्याचा योग्य लाभ घ्यावा असे आवाहनही केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश गाळवणकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, अतुल काळसेकर कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका संध्या तेरसे,राजू राऊळ, बंड्या सावंत निलेश तेंडुलकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्या कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला ,महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page