कणकवली /-

कणकवली तालक्यातील वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांच्याविरोधात आज ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर झाला. आजच्या विशेष ग्रामसभेत सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरुद्ध १७७ आणि बाजूने ४७ मते पडली. वागदे सरपंच यांना ग्रामपंचायत सदस्य आणि पाठोपाठ त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी देखील जोरदार धक्का दिला आहे. वागदे गावच्या थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या पूजा घाडीगावकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात सदस्यांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर ८ विरुद्ध ० अशा मताने ठराव मंजूर करण्यात आला होता. ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला गेला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वागदे सांस्कृतिक हॉल येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने १७७ जणांनी मतदान केले. तर ठरावाच्या विरोधात सरपंच घाडीगावकर यांच्या बाजूने अवघ्या ४७ जणांनी मतदान केले. तर ४३ मते बाद ठरली. या अविश्वास ठराव करिता २६७ ग्रामस्थांनी मतदान केले होते. ग्रामपंचायत सरपंच पूजा घाडीगावकर यांना ग्रामस्थांनी देखील नाकारल्याने हा एक प्रकारे त्यांना धक्का मानला जात आहे. यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आर एल शिंदे, सुनील पांगम, अधीक्षक पी. डी. पालकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page