You are currently viewing हडी जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

हडी जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मसुरे /-

हडी गावातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून नेहमीच प्रयत्न असतात. जेष्ठ ग्रामस्थांनी वय वाढत असलं तरी मनाने नेहमी तरुण रहावे. हडी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम अनुकरणीय असतात. तरुणांना लाजविणारे उपक्रम या संघाच्या माध्यमातून सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून पूर्ण होतात. सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी आपली एकी कायम ठेवत संघाचा नावलौकिक आणखी वाढवावा. भविष्यात सुद्धा आपले सहकार्य या संघास लाभेल, असे प्रतिपादन माजी सभापती उदय परब यांनी येथे केले.

फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरीक सेवा संघ हडीचा १५ वा वर्धापन दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती उदय परब, कांदळगाव सरपंच उमदी परब, जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन सिंधुदुर्ग प्रतिनिधी प्रथमेश सावंत, संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले, पडवे हॉस्पिटलचे डॉ. घाडीगावकर, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, कार्यवाह सुभाष वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष मोहन घाडीगावकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे डॉ. संदिप कदम, सिद्धेश घारे, रविंद्र केळुसकर आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्ष कै. साबाजी हडकर याना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधत वैवाहीक जीवनाची ५० वर्ष पुर्ण केलेल्या वनिता विश्राम हडकर व सुहासिनी गणेश परब या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वयाची ७५ वर्ष पुर्ण केलेल्या ५५ सभासदांचा भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला. जेष्ठ नागरिक राष्ट्रीय हेल्पलाईन प्रतिनिधी प्रथमेश सावंत यांनी जेष्ठ ग्रामस्थांना आधार वाटावा, यासाठी हेल्प लाइनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांची महिती दिली. जेष्ठ ग्रामस्थांनी कोणतीही समस्या असल्यास सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १४५६७ या शासनाच्या हेल्प लाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. हडीतील जेष्ठ नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. गावातील अनेक प्रश्नावर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आवाज उठवतात. माजी अध्यक्ष कै. साबाजी हडकर यांनी लावलेले रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. सल्लागार म्हणून पाटकर काका लाभले हे सर्व जेष्ठ नागरिकांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन कांदळगाव सरपंच उमदी परब यांनी केले. अवयवदान महत्व आणि त्याबद्दलची माहिती सुरेश भोजणे यांनी दिली. लाईफ टाईम हॉस्पिटल पडवेचे डॉ. घाडीगांवकर यांनी हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व आरोग्य सुविधा याबाबत मार्गदर्शन केले.

नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे माजी सचिव तथा सल्लागार चंद्रकांत पाटकर यांचा संघासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपसचिव रमाकांत सुर्वे, सल्लागार चंद्रकांत पाटकर, कार्यकारीणी सदस्य दिनकर सुर्वे, प्रभाकर चिंदरकर, बाबु मेस्त्री, रमेश कावले, गणु परब, शंकर पाटील, यशवंत शेटये, मनिषा पोयरेकर, प्रज्ञा तोंडवळकर, सुप्रिया वेंगुर्लेकर, जानु कदम, वनिता हडकर, शांताराम साळकर यांच्यासह बाळकृष्ण माणगावकर, देवेंद्र घाडीगावकर, गुरुनाथ गावकर, दिनकर सुर्वे, रामदास पेडणेकर, उमेश हडकर, सुरेश भोजणे, गणेश परब, मंगेश शेर्लेकर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रकांत पाटकर तर आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..