You are currently viewing जि. प. च्या पाणी व स्वच्छता विभागातील एसी मशीनला अचानक आग,बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला.

जि. प. च्या पाणी व स्वच्छता विभागातील एसी मशीनला अचानक आग,बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला.

सिंधुदुर्ग /-

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात बसविण्यात आलेल्या एसी मशीनला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत विभागातील कर्मचाऱ्यांना समजतात लागलीच त्यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. बांधकाम कर्मचाऱ्यांनी ही आग फायर फायटर सिलेंडरच्या सहाय्याने आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या केबिनच्या पाठीमागे एसी मशीन बसविण्यात आली आहे. आज दुपारी बाराच्या दरम्यान केबिनच्या पाठीमागे जळल्यासारखा वास येऊ लागला व त्यातून धूरही पसरू लागला. यामुळे कार्यालयात बसलेले विनायक ठाकूर यांनी आपल्या बाजूच्या कर्मचाऱ्यांना त्याची कल्पना दिली. कर्मचारी प्रवीण काणकेकर यांनी बांधकाम विभागातील वीजतंत्री कर्मचारी हरमलकर यांना पाचारण केले. त्यांनी विभागाच्या लगत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये असलेल्या खिडकीमधून पाहिले असता एसी मशीनला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी लागलीच आग प्रतिबंधक फायर फायटर सिलेंडर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर आग आटोक्यात आली. स्वच्छता विभागाच्या एसी मशीनला आग लागल्याची माहिती मिळताच लघु पाटबंधारे, महिला बालकल्याण आणि अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात बांधकाम विभागाचे कर्मचारी हरमकर यांना यश आले. तेथील वीज प्रवाह खंडित करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला.

प्रतिक्रिया व्यक्त करा