You are currently viewing किरकोळ वादातून हुंबरट येथे मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक जखमी.

किरकोळ वादातून हुंबरट येथे मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक जखमी.

कणकवली /-

मुलाने भ्रमणध्वनीवर मेसेज पाठवून मारण्याची धमकी दिल्याच्या गैरसमजातून हुंबरट, पिंपळवाडी येथील संतोष सहदेव बोभाटे (४८) यांना त्यांच्या पत्नी व मुलासह शिवीगाळ करीत मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संतोष बोभाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये विठोबा तुकाराम मर्ये, दिलीप तुकाराम मर्ये, सागर दिलीप मर्ये, कैलास दिलीप मर्ये (सर्व राहणार हुंबरट, पिंपळवाडी ) यांचा समावेश आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष बोभाटे यांचा मुलगा गणेश याने सागर मर्ये याच्या दुचाकीत पेट्रोल न टाकता चालविली होती. त्यावरून काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास विठोबा तुकाराम मर्ये, दिलीप तुकाराम मर्ये, सागर दिलीप मर्ये, कैलास दिलीप मर्ये हे संतोष बोभाटे यांच्या घरी आले. तसेच तुमच्या मुलाने भ्रमणध्वनीवर मेसेज पाठवून  आमच्या मुलाला मारण्याची धमकी दिली आहे. असे सांगत शिवीगाळ करायला सुरुवात केली. बोभाटे यांनी तुम्ही शिवीगाळ करू नका आपण सामोपचाराने विषय मिटवूया. असे सांगूनही त्या चौघानी काहीही न ऐकता बोभाटे यांना व त्यांच्या मुलास लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांची पत्नी भांडण सोडविण्यास मध्ये आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. काही वेळाने ते चौघेही तेथून निघून गेले. मात्र, बोभाटे यांच्या पायाला जोरदार दुखापत झाल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला प्लास्टर घालण्यात आले. त्यांची तब्बेत काहीशी सुधारल्या नंतर संबधित घटनेबाबत त्यांनी मंगळवारी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील करीत आहेत.

अभिप्राय द्या..