सिंधुदुर्ग /-
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांची भेट घेऊन कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात पद निर्मितीची कार्यवाही तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेला औषध पुरवठा सुरळीत करणे व इतर आरोग्य विषयक प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यावर प्रदिप व्यास यांनी रुग्णालयात पदनिर्मीती ची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे असे सांगत तातडीने औषध पुरवठा करण्याबरोबरच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच उचित कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून या रुग्णालयाकरिता ९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.त्याबाबतची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.जेणेकरून रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण होताच ते रुग्णालय लोकांच्या सेवेत रुजू करता येईल.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर व इतर आजारांसाठी जिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा मागणीनुसार तातडीने करण्यात यावा. व इतर आरोग्य विषयक प्रश्नांकडे आ.वैभव नाईक यांनी प्रधान सचिव प्रदिप व्यास यांचे लक्ष वेधले असता त्याबाबत लवकरात लवकर उचित कार्यवाही केली जाणार असल्याचे श्री व्यास यांनी सांगितले आहे.त्याचबरोबर महिला बाल रुग्णालयाच्या पदनिर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे असे सांगितले.