कुडाळ /-
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सध्या जिल्ह्यात पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्या उपस्थित जिल्हा बँकेचे एक विद्यमान संचालक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्ह्यात दाखल झाले असताना या घडामोडी घडत आहेत. या वृत्ताला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दुजोरा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक सध्या चर्चेत आली आहे ती महा विकास आघाडी आणि भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्ये होणाऱ्या थेट लढती मुळे, जिल्हा बँक सध्या महाविकास आघाडीकडे आहे. तर ही बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूर्ण ताकद लावली आहे.
तर बँक आपल्याच ताब्यात राहावी यासाठी महाविकासआघाडी मधील सर्वच पक्षांनी एकत्रित येत मोठी लढत उभी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शुक्रवारी ते जिल्हा बँक निवडणुकीतील भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्ह्यात दाखल होत असून, यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे एक विद्यमान संचालक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. दरम्यान या वृत्ताला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दुजोरा दिला आहे. तसेच जिल्हा बँकेवरचे आपले वर्चस्व कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.