You are currently viewing महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकाला अटक…

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकाला अटक…

बांदा /-

विवाहितेची छेड काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल विजय सावंत (२२) रा. पाशीवाडी, असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी तालुक्यातील एका महिलेने बांदा पोलीसात दिली. त्यानुसार संशयिताला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार महिलेच्या पतीचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांचे पाशीवाडी येथे गोडाऊन आहे. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महिला आपल्या पतीला जेवण देण्यासाठी गेली होती. त्यावेळी काळोखात दबा धरून बसलेल्या राहुलने महिलेला पाठीमागून पकडत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने त्याने तिला नजीकच्या पाण्याच्या डबक्यात ढकलून दिले. यामध्ये महिलेला किरकोळ दुखापत झाली. महिलेने रात्री उशिरा आपल्या पतीसह बांदा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

घटनेनंतर फरार झालेल्या राहुलला बांदा पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्याला उद्या न्यायालयात हजर करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल माया पवार करत आहेत.

अभिप्राय द्या..