नवी दिल्ली /-

कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

ओपन एअर थिएटर्सही उघडण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशातील 10 राज्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून 50 टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका वेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाऊ शकते.

ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे आवश्यक आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page