You are currently viewing कनेडी पंचक्रोशी समूह आयोजित उद्योग संधी व शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर,..

कनेडी पंचक्रोशी समूह आयोजित उद्योग संधी व शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर,..

कणकवली /-

विकास प्रक्रिया ही एककल्ली नसते, त्यात प्रशासनाबरोबरच नागरीकांनीही सकारात्मकतेने सहभागी व्हायचे असते. समृध्द व आनंदी गाव या उपक्रमातून गावागावात जाताना या विकास प्रक्रियेमध्ये नागरीकांना सहभागी करून घेतले जात आहे. समृध्द जीवनाबरोबरच आनंदी जीवनही तेवढेच महत्वाचे आहे. यासाठी गावातच रोजगार संधी निर्माण झाल्या पाहीजेत. गावातील पैसा हा गावातच राहताना अन्य भागातुनही पैसा गावात यायला हवा. यासाठी उद्योजक होणे आवश्यक आहे. शेतकरीसुध्दा उद्योजक होवू शकतो, मात्र त्यासाठीचे पूरक वातावरण निर्माण करूया, असे आवाहन माजी खासदार ब्रि. सुधीर सावंत यांनी केले.

कनेडी पंचक्रोशी समूह यांच्यावतीने कनेडी समाधी पुरूष सभागृहात आयोजित उद्योगसंधी आणि शासकीय योजना विषयावरील मार्गदर्शन शिबिरात ब्रि. सुधीर सावंत बोलत होते. कै. वाय.डी. सावंत यांचे सुपूत्र मकरंद सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र सावंत, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र किर्लोस व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोसचे प्रा. भास्कर काजरेकर, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, बाळकृष्ण गावडे, डॉ. विलास सावंत, डॉ. सोनाली पावसकर, आनंद सावंत, सुभाष बांबुळकर, बँक ऑफ इंडियाचे संदेश कासले, कनेडी पंचक्रोशी समूहचे प्रमोद सावंत, महेश सावंत, मनोज सावंत, समाधी पुरूष हितचिंतक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर सावंत यांच्यासह कनेडी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व उद्योग व्यवसाय करण्यासाठी इच्छूक नागरीक, बचतगटांचे सदस्य उपस्थित होते.

ब्रि. सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येत असलेला समृध्द व आनंदी गाव हा उपक्रमाला आता महाराष्ट्र शासनाचेही सहकार्य लाभत आहे. कोकणातील बुध्दीमान माणसे नोकरीव्यवसायानिमित्त मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये गेली आहेत. भविष्यात अशी माणसे गावागावात स्थिरावतील यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत. कोकणात पर्यटन व इतर क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण व्हायला हवा हे कै. वाय.डी. सावंत यांचे स्वप्न होते. त्यांनीच कनेडीमध्ये उभारलेल्या या वास्तुमध्ये उद्योग व्यवसाय उभारण्याविषयी संवाद होत आहे याचा आनंद आहे. बचतगटांनी उत्पादीत केलेल्या मालाचे मार्केटींग व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. मार्केटींग सिस्टीम तयार केली जात असून सिंधुदुर्गात उत्पादीत होणार्‍या वस्तू महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जातील याचे प्रयत्न करूया असे सांगितले.

स्वयंरोजगार उभारणीविषयी संदेश कासले यांनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती डॉ. विलास सावंत व भास्कर काजरेकर यांनी दिली. उपस्थितांच्या शंकांचे निसरन करण्यात आले. येत्या काळात कनेडी पंचक्रोशी समुहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यवसाय उद्योग उभारण्यासाठीचे प्रयत्न एकत्रितपणे करूया, त्याचबरोबर ग्रामीण भागातील कनेडी सारख्या छोट्या बाजारपेठांपर्यंत परप्रांतीय व्यवसायिक पोहोचणार नाहीत, यासाठी स्थानिक व्यवसाय उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेवूया असा निर्धार या शिबिरात करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार महेश सावंत यांनी मानले.

अभिप्राय द्या..