You are currently viewing चिपी विमानतळ उद्घाटन दिनी धरणे आंदोलन होणारच.;जिल्हा प्रशासनाच्या चर्चेनंतर युट्युब व सोशल मीडिया पत्रकारांचा निर्णय..

चिपी विमानतळ उद्घाटन दिनी धरणे आंदोलन होणारच.;जिल्हा प्रशासनाच्या चर्चेनंतर युट्युब व सोशल मीडिया पत्रकारांचा निर्णय..

ठोस तोडगा निघाला नाहीच ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची माहिती..

सिंधुदुर्ग /-

जिल्हा प्रशासनाकडून युट्युब चॅनेल व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाकारलेल्या चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशाऱ्यानंतर आयोजित जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सुवर्णमध्य निघाला नसल्याने आंदोलनावर ठाम असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळाचा उद्घाटन सोहळा येत्या ९ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न होत आहे. मात्र जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकारांना जिल्हा प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात आला आहे. यानंतर युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यादिनी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी निमंत्रण देऊन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्यासोबत बैठक आज घडवून आणली. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाध्यक्ष श्री. खवणेकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष समिल जळवी,सहसचिव कृष्णा सावंत,सदस्य मिलिंद धुरी, आनंद कांडरकर आदी संघटनेचे पदाधिकारी व युट्युब चॅनेल धारक तसेच सोशल मीडिया पत्रकार उपस्थित होते.

जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ उद्घाटन सोहळा महाराष्ट्र शासनाचा निमंत्रित कार्यक्रम असून मर्यादित क्षमतेने संपन्न होणार आहे. विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ स्तरावरुन मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील आपल्या निवेदनाचा विचार करू आणि यावर तोडगा काढू, असे आश्वासन देत सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केले.

चिपी विमानतळ होण्यासाठी खासकरून जिल्ह्यातील युट्युब चॅनेल व सोशल मीडिया पत्रकारांनी सुरुवातीपासून वेळोवेळी आवाज उठविला आहे. बाहेरच्या आणि जिल्ह्यातील काही मोजक्या मीडिया धारक व पत्रकारांना परवानगी देऊन विमानतळासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या जास्तीत जास्त पत्रकारांना नाकारणे हा भेदभाव मान्य नसल्याचे सांगून येत्या ९ ऑक्टोबरच्या धरणे आंदोलनावर अटळ असल्याचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा